रेडिओ फ्रिक्वेन्सी वीज मीटर ग्राहकांच्या फायद्याचे

0

लवकरच जळगाव शहरात बसविणार

महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांची माहिती

जळगाव – रेडिओ फ्रिक्वेन्सी वीज मीटर ग्राहकांच्या फायद्याचे असून, यामुळे मानवी हस्तक्षेप विरहित मीटर रीडिंग घेण्यासह वीज वापराची अचूक व वेळेवर नोंद करणे शक्य झाले असल्याची माहिती महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिली. ते, शुक्रवारी (दि.19) महावितरण कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत बोलत होते. योजनांची माहिती यावेळी सांगण्यात आली.
दीपक कुमठेकर यांनी सांगितले की, जळगाव परिमंडळात पुनर्रचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल, धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर व दोंडाईचा आणि नंदुबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा आदी शहरांमध्ये 3 लाख 6 हजार 37 ग्राहकांकडे रेडिओ फ्रिक्वेन्सी वीज मीटर बसविले जात आहेत. या मोहिमेत सरसकट सर्वच मीटर बदलले जाणार आहेत. सुक्ष्म स्वरुपातील वीज वापराची (उदा.एलईडी, मोबाईल चार्चिंग) नोंदही या मीटरवर होते. पण त्यामुळे हे मीटर नियमित गतिपेक्षा अधिक वेगाने फिरतात असे म्हणणे चुकीचे आहे. तसा गैरसमज लोकांमध्ये निर्माण केला जात आहे. उलट हे मीटर वीज वापराची अचूक आणि वेळेवर नोंद ठेवण्याचे काम करते. त्याला अनेक प्रकारचे लॉक (सील) असून, त्याच्याशी छेडछाड झाल्यास त्याची नोंद तत्काळ सिस्टीमला होते. लवकरच जळगाव शहरात देखील हे मीटर बसविले जाणार आहेत, अशी माहितीही दीपक कुमठेकर यांनी दिली. एचव्हीडीएच योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, एसएमएस सुविधा, गो-ग्रीन, महावितरण वॉलेट आदी योजनांची माहिती यावेळी सांगण्यात आली.
एमआयडीसीमध्ये नवीन सबस्टेशन
जळगाव एमआयडीसीतील एम व एस सेक्टरमध्ये नवीन सबस्टेशन प्रस्तावित आहे. भुसावळमध्ये कमी जागेत अत्याधुनिक पध्दतीचे सबस्टेशन उभे केले जात आहे. तसेच जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा मुख्यालय ठिकाणी अंडरग्राऊंड वीज वाहिनीचा प्रस्ताव आहे. परंतु याचा खर्च मोठा आहे. त्यामुळे सध्या तरी हा प्रस्ताव प्राथमिक स्तरावरच आहे, अशी माहितीही दीपक कुमठेकर यांनी दिली. जळगाव शहरात कोटेड ओव्हरहेड केबल टाकण्यात येणार आहे. यामुळे आकड्यांना आळा बसेल, असेही ते म्हणाले.
कोणतेही छुपे दर नाहीत
सध्याचे मीटर बदलून तेथे रेडिओ फ्रिक्वेन्सी वीज मीटर बसविण्यासाठी कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नाही. हे मीटर पूर्णतः मोफत असल्याचे दीपक कुमठेकर यांनी स्पष्ट केले.