मेहुणीवर बलात्कार करुन खून ; जळगावच्या आरोपीला दुहेरी जन्मठेप

0

22 नोव्हेंबर 2016 मधील घटना, पीडित महिलेच्या पतीनेच लावून दिली होती नोकरी

जळगाव – चाळीसगाव तालुक्यातील एका हॉटेलामधील वेटरच्या पत्नीवर याच हॉटेलमधील तिच्या नातेवाईक तरुणाने बलात्कार करून तिचा खून केला होता. 22 नोव्हेंबर 2016 मधील या घटनेप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपी नरेंद्र रवतेकर (रा. बळीराम पेठ) यास दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्या. आर. जे. कटारिया यांनी सोमवारी, हा निकाल दिला.

पीडित विवाहितेचा पती चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असून, तो तालुक्यातीलच एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होता. या दरम्यान नात्याने साडू असलेल्या नरेंद्र रवतेकर याला पीडितेच्या पतीने स्वतः काम करत असलेल्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी लावून दिली. रवतेकर हा पीडित महिला व तिच्या पतीसह राहू लागला. 22 रोजी, पीडितेचा पती हॉटेलमध्ये कामासाठी गेला होता. यावेळी फिर्यादी घरी एकटी असल्याची संधी साधून नरेंद्रने पीडितेवर बलात्कार करुन तिचा खून केला. काही वेळानंतर घरी आलेल्या महेश पवार याने हॉटेलमध्ये पीडित महिलेच्या पतीला प्रकार कळविला. पीडितेचा पती हा आपल्या सहकार्‍यांसह घरी पोहोचला असता सर्व प्रकार समोर आला. यावेळी आरोपी हा पीडितेच्या मृतदेहावर वाळू टाकून प्रेत पुरण्याचा प्रयत्न करत होता.

उपकाराची फेड करण्याऐवजी बलात्कार करुन मारले

नरेंद्र याने हॉटेलमध्ये नोकरीसाठी पीडितेकडे विनवणी केली होती. पीडितेचा पती यासाठी तयार नव्हता. अखेर पीडितेच्या सांगण्यावरुन आरोपी नरेंद्रला कामावर लावले. मात्र नरेंद्रने उपकाराची फेड न करता पीडितेवर बलात्कार करुन तिचा जीव घेतला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी अरविंद देवरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पीडित महिलेचा मृतदेह चाळीसगाव रुग्णालयात पाठविला. तेथे शवविच्छेदन केले असता महिलेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. बलात्काराला विरोध केला म्हणून नरेंद्रने पीडितेचा खून केला व पुरावा लपविण्याच्या उद्देशाने वाळू टाकून प्रेत पुरण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपास पूर्ण झाल्यानंतर अरविंद देवरे यांनी नरेंद्रविरुध्द कलम 302, 376 फ व 201 प्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते.

अशी झाली आहे शिक्षा

खटल्यात आठ जणांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोपीस कलम 302 प्रमाणे जन्मठेप, 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम 376 फ प्रमाणे जिवंत असेपर्यंत जन्मठेप, 1 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तर कलम 201 प्रमाणे 7 वर्ष सश्रम कारावास, 500 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा (शेंदुर्णीकर) यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी शालीग्राम पाटील, केसवॉच गोरख चकोर यांनी महत्त्वाची मदत केली.