राष्ट्रवादीकडून रावेरमध्ये चंद्रकांत पाटील?

0

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराचा शोध सुरू असतांना आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्याविषयी चाचपणी सुरू आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या विद्यमान खा. रक्षा खडसे यांच्याविरोधात कोणता उमेदवार द्यायचा? यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अद्यापही पेच कायम आहे. राष्ट्रवादीत इच्छूक असतांना इतर पक्षातील उमेदवारांची राष्ट्रवादीकडून चाचपणी केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत या प्रकाराविषयी मोठी खदखद व्यक्त केली जात आहे. दरम्यान माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी बुधवारी, राष्ट्रवादीने प्रवेशाची ऑफर दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यास रावेर लोकसभा मतदारसंघातील लढत ही चुरशीची होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने दिवसभर सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा होती.

उध्दव ठाकरेंशी चर्चा करून निर्णय घेणार ः चंद्रकांत पाटील
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने मला ऑफर दिली हे खरे आहे. परंतु मी अनेक वर्षांपासून शिवसेनेचे काम करीत असून शिवसैनिक आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी ‘जनशक्ति’शी बोलतांना सांगितले.