रावेर मतदारसंघातून खा. रक्षा खडसेंची उमेदवारी निश्‍चित

1

जळगाव । जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपाकडून पुन्हा उमेदवारी निश्‍चित झाली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, जळगाव लोकसभेसंदर्भात अद्याप आ. स्मिता वाघ आणि करण पवार यांच्या नावांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने खडसे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक गुरुवारी, दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शहा यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. त्यात जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली.

रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे व अजय भोळे या दोघांचीच नावे होती. पक्षाने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा संधी देत रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्‍चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळगाव लोकसभा मतदारसंघातून आ. स्मिता वाघ व करण पवार यांच्या नावांबाबत रस्सीखेच सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर आता या मतदारसंघात काँग्रेस की राष्ट्रवादी? हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरित आहे. येत्या दोन दिवसांत भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत 17 ते 18 नावे निश्‍चित झाली असून, पाच ते सहा जागांवर अद्याप खल सुरू असल्याचे कळते.