परतीच्या पावसाने 19 हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

0

19 हजार हेक्टरवरील कपाशीच्या पिकासह ज्वारी व मक्याचे पीक धोक्यात

भुसावळ: यंदा पावसाने चांगलाच कहर केला असून सुरूवातीला पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला मात्र ऐन दिवाळीच्या सणावर ओला दुष्काळ पडल्याने अवकाळी पाऊस हा शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. अतिवृष्टीच्या पावसाने कहर केल्याने तालुक्यातील कापूस, मका व ज्वारीचे पीक धोक्यात आले असून शेतकर्‍यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यामूळे शेतकर्‍यांनी शासनाकडे पिकांचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे तसेच शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदतीची अपेक्षाही व्यक्त केली आहे. शेतकरीच अस्मानी संकटात सापडल्याने याचा परीणाम बाजारपेठेवर होणार असल्याचे दिसून येत आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून आता भरपाई द्यावी, असा सूर शेतकर्‍यांमधून उमटत आहे.

आधी दिलासा, नंतर मनस्ताप

गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने सुरूवातीच्या काळात समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या इतकेच नव्हेतर उन्हाळ्यात कोरड्याठाक पडलेल्या विहिरींना काठोकाठ पाणी आले तर पावसाने काही दिवस उघडीप दिल्याने शेतकर्‍यांना बर्‍यापैकी दिलासा मिळाला होता मात्र यानंतर पुन्हा पावसाच्या सततच्या रीपरीपमुळे उडीद, सोयाबीन, मुग अशा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामूळे शेतकर्‍यांनी कापूस या पिकावर आपली मदार केेंद्रीत केली मात्र, पावसाने पुन्हा सहा दिवसांपासून हजेरी लावल्याने तालुक्यातील 19 हजार हेक्टरवर लागवड केलेल्या शेतकर्‍यांचे पांढरे सोने संकटात सापडले आहे तसेच पाच हजार हेक्टरवर मका तर एक हजार 500 हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मका आणि ज्वारीच्या कणसांना अंकूर फूटत असल्याने शेतकरी चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे. ऐन दिवाळीच्या सणाच्या कालावधीत पडत असलेला अवकाळी पाऊस हा शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे यामुळे शेतकर्‍यांना आता पाऊस नकोसा झाला आहे तर पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांनी शासनाने पंचनामे करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

राज्यात यंदा पावसाने सुरूवातीला समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी पेरणीच्या कामासह इतर शेतीच्या मशागतीची कामे वेळेवर आटोपली मात्र सततच्या पावसाने शेतातील उडीद, मुग व सोयाबीनचे पीक शेतकर्‍यांच्या हातून निघून गेले. यामुळे शेतकर्‍यांनी कापूस या पिकावर लक्ष केंद्रीत करून कापसामुळे दिलासा मिळेल, अशी शेतकर्‍यांमध्ये आशा निर्माण झाली होती मात्र दिवाळीच्या काळातही पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतकेच नव्हेतर सततच्या पावसाने कापूस या पिकावर विविध रोगांचा प्रार्दुभाव वाढत आहे तसेच शेतातील ज्वारी, मका असे धान्य सततच्या पावसाने शेतातच सडत असल्याने शेतकर्‍यांनी शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

बाजारपेठेवर परिणाम

ऐन सणासुदीच्या काळात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. दिवाळी या सणाच्या काळात शेतकरी आपल्या शेतातील ज्वारी, मका, उडीद, मूग आणि कापूस या पिकाची काही प्रमाणात विक्री करून सण साजरा करतात. यंदा मात्र दिवाळीच्या सणाच्या काळातच पावसाने अवकाळी हजेरी लावल्याने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्‍यासमोर दिवाळीचा सण कसा साजरा करावा ? असे संकट उभे राहिले असल्याने याचा परीणाम बाजारपेठेवर होणार असल्याने व्यावसायीकही हतबल झाले आहे.

भाजीपालाही झाला महाग

भुसावळ तालुक्यातील किन्ही, साकरी, तळवेल आदी भागातील शेतकरी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात मात्र पावसाच्या सततच्या रीपरीपमुळे भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर आकाशाला भिडले आहेत. बाजारात पालेभाज्यांचे दर 80 ते 90 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत तसेच कांद्याचे दरही तब्बल 60 रुपयांवर पोहोचल्याने घरातील जेवणाच्या ताटातून तसेच हॉटेलमधूनही कांदा दिसेनासा झाला आहे.

अशी आहे तालुक्याची भौगोलिक स्थिती

भुसावळ तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 43 हजार 138 असून खातेदार संख्या 39 हजार 663 इतकी आहे. भौगोलिक क्षेत्रामधील वहितीलायक क्षैत्र 28 हजार 559 हेक्टर तर पडीत क्षेत्र 313.13 व बागायती क्षेत्र चार हजार 510 हेक्टर आहे. वनक्षेत्र दोन हजार 960 तर कुरण क्षेत्र 360 हेक्टर असून सिंचन विहिरींची संख्या 4 हजार 110 इतकी आहे.

शेतकर्‍यांनी उपाययोजना करावी

शेतकर्‍यांच्या कापूस या पिकावर बुरशीजन्य रोगासह विविध रोगांचा प्रार्दूभाव वाढत असल्याने शेतकर्‍यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून यावर उपाययोजनांची माहिती घेवून उपाययोजना करणे आवश्यक आहे तसेच शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे, असे तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी सांगितले.