महसूलतर्फे तलाठी पदाच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर

0

जळगाव : शासनाच्या महसूल प्रशासनाकडून तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला आहे. परीक्षेच्या निवड यादीत गुणवत्तेनुसार नावे न आल्याने 50 ते 60 उमेदवारांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. निकालाच्या यादीत घोळ झाल्याचे सांगून नवीन यादी लावण्यात यावी, अशी मागणी केली.

तलाठी परीक्षेच्या निकालाच्या यादीत अधिक जास्तीचे गुण मिळालेल्या उमेदवारांना डावलून कमी गुण असलेल्या उमेदवारांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची गुण जास्त असताना नावे आलेली नाही. अशा उमेदवारांनी सोमवारी, 23 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमा होऊन जाब विचारला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कर्मचार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे उमेदवारांनी थेट जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी उमेदवारांची बाजू समजून घेत नवीन यादी लावण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी गुणवत्तेच्या आधारे मेरिट लिस्ट जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आली.

कटऑफ लिस्ट जाहीर झाली नाही

तलाठी परीक्षेची यादी जाहीर करताना कट ऑफ लिस्ट जाहीर करणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाकडून ही लिस्ट जाहीर करण्यात आलेली नाही, असा आरोप उमेदवारांकडून करण्यात आलेला आहे. परीक्षेला 22 हजार परीक्षार्थी बसलेले होते. सर्वांची यादी जाहीर करावी, 99 जागांसाठी परीक्षा झाली. त्यापैकी 190 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी कोणत्या आधारे लावण्यात आली याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने द्यावे, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. यावेळी शुभम जोशी, रितेश सोनवणे, शर्मिला गोल्हाहीत, संदीप बोरसे, संग्राम पाटील यांच्यासह चाळीस ते साठ उमेदवार उपस्थित होते.