खोट्या पासिंगने वाहने विकली, मुक्ताईनगर भाजपाचा पदाधिकारी अडकला

0

60 वर्षीय व्यक्तीची फिर्याद

मुक्ताईनगर – शहरातील गोदावरी नगरमध्ये राहणारे भाजपाचे कार्यकर्ते शिवराज ब्रिजलाल पाटील (वय 40) यांनी मोटरसायकल विक्री करताना खोटे नंबर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी शेख इसाक शेख करीम मनियार (वय 60, राहणार गोदावरीनगर मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी शिवराज ब्रिजलाल पाटील यांच्याकडे मुक्ताईनगर येथे यामाहा या कंपनीचे शोरूम होते. त्या माध्यमातून ते मोटरसायकली विक्रीचे काम करत होते. फिर्यादीने आरोपीकडून यामाहा कंपनीची 97 हजार रुपये किमतीची मोटर सायकल घेतली होती. यासंदर्भात व्यवहार करताना चाळीस हजार रुपये रोख घेतलेले होते व बाकीचे कर्ज मिळवून देऊ असे सांगण्यात आले.

खरेदी केलेल्या गाडीचे चलनावर इंजिन नंबर 25 आर जी झिरो 721 झिरो 16 39 14 व चेचीस नंबर एमआयआर जी झिरो सातशे एकवीस झिरो 16 39 14 96 असा नमूद होता. पासिंग नंबर एमएच 19 सीपी 2892 असा देण्यात आला होता मात्र हा नंबर दुसर्‍याच गाडीचा निघाला. म्हणजेच चुकीचा नंबर देऊन फसवणूक करण्यात आली. त्यानंतर उर्वरित रकमेचे हप्ते देखील मला भरण्यास सांगितले. या संदर्भात मी लोकसुविधा फायनान्स मुख्य कार्यालय जळगाव येथे जाऊन खात्री केली असता माझेवर 41 हजार 727 रुपये भरणे बाकी असल्याचे सांगण्यात आले व मोटरसायकलचे आरसी बुक पंधरा दिवसात मिळेल असेही सांगण्यात आले, असे फिर्यादीने म्हटले आहे.

26 ऑक्टोबर 2017 रोजी मी लोकसुविधा कार्यालयात उर्वरित रोख रक्कम भरली व सुविधा कंपनीच्या शिक्क्याची पावती व हप्ते भरणा केल्याचे विवरणपत्र देखील मिळाले पंधरा दिवस होऊनही मला मोटरसायकलचे आरसी बुक मिळाले नाही म्हणून मी उज्वल यामाहा शोरूमचे मालक शिवराज पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काळजी करू नका असे सांगितले. मात्र त्यानंतर माझी फसवणूक झाल्याचे मला लक्षात आले. मला देण्यात आलेला मोटरसायकल क्रमांक हा अनिल मराठे यांच्या हिरो कंपनीच्या सीडीएच एफ डिलक्स नावे असल्याचे लक्षात आल्याने माझी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आपण पुन्हा शिवराज पाटील यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला एमएच 19 डी जी 8019 हा नंबर दिला. मात्र तो तपासणी केली असता तो नंबर बजाज प्लॅटिनाचा असून किशोर महाजन यांचे नावे असल्याचे समजले. यावरून माझी फसवणूक झाल्याचे मला लक्षात आले. दरम्यान मुक्ताईनगर पोलिसात शेख जाकीर शेख नासिर, रफिक खान शेर खान, मोहम्मद जहीर मोहम्मद, समृद्धी मोहम्मद शेख, फिरोज खान, शेख हसन शेख जहीर, अशोक शामलाल जाधव (सर्व राहणार मुक्ताईनगर) तसेच मुकुंद रतन जैन (शिरसाळा, तालुका बोदवड) यांनी देखील आपली फसवणूक केल्याचे मुक्ताईनगर पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. शिवराज पाटील हे भाजपाच्या सोशल मीडिया सेलचे तालुका सरचिटणीस असून, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने मुक्ताईनगर तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे.

राजाश्रयामुळे पोलिसांची टाळाटाळ
फसवणूक झालेले वाहनधारक 15 दिवसापासून पोलिसात फिर्याद देण्यासाठी फिरत होते मात्र राजाश्रयामुळे पोलीस टाळाटाळ करीत असल्याने वाहनधारकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्याकडे कैफियत मांडली. त्याची दखल घेत पाटील यांनी वाहनधारकांसह पोलीस स्टेशन गाठत गुन्हा का दाखल करीत नाही असा जाब विचारला व पोलीस निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे सांगितले.