भुसावळ मतदारसंघात सात उमेदवारांचे अर्ज अवैध: दोन हरकती निकाली

0

भुसावळ: भुसावळ विधानसभा मतदार संघात 22 उमेदवारांनी 36 नामाकंन दाखल केल्यानंतर शनिवारी झालेल्या छाननीत आमदार सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी (डमी) नामाकंनासोबत भाजपाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांच्यासह अन्य सात उमेदवाराचे अर्ज अवैध ठरवण्यात आले तर अपक्ष उमेदवार सतीष घुले व अपक्ष उमेदवार गीता खाचणे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली मात्र दोन्ही हरकती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निकाली काढल्या.

छाननीत सात अर्ज अवैध

शनिवारी तहसील कार्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी 22 उमेदवारांनी दाखल केलेल्या नामाकंन पत्रांची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये रजनी सावकारे यांनी दाखल केलेल्या भाजपाच्या उमेदवारी नामाकंनासोबत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला तसेच अन्य सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. अपक्ष उमेदवार जानकीराम सपकाळे यांनी अपक्ष उमेदवार सतीष घुलेे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दडवुन ठेवली असल्याची हरकत घेतली होती मात्र निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी प्रतिज्ञापत्रावर निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे सांगत त्यांचा अर्ज नामंजूर केला. सपकाळे यांनी वराडसीम सरपंच गीता खाचणे यांच्या जातीच्या दाखल्याबाबत हरकत अर्ज दिला होता मात्र निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाणे यांनी त्यांचाही अर्ज निकाली काढून गीता खाचणे यांचा अर्ज मंजूर केला. यावेळी तहसीलदार दीपक धीवरे यांची उपस्थिती होती.

उमेदवारांच्या नामाकंन पत्र छाननी प्रक्रियेनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या 21 उमेदवारांपैकी कोण-कोणते उमेदवार आपले नामाकंन मागे घेणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. माघारीनंतरच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्याला रंगत येणार असून चित्रदेखील स्पष्ट होणार आहे. मुक्ताईनगर- विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 14 उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी अंती 12 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज स्वीकृत झाले. एकनाथराव खडसे यांचे देन उमेदवारी अर्ज एबी फार्म नसल्याने अवैध ठरविण्यात आले. भाजपचे मुख्य उमेदवार म्हणून अ‍ॅड.रोहिणी एकनाथराव खडसे असल्याने पर्यायी उमेदवार अशोक कांडेलकर याचा अर्ज बाद झाला आहे. विनोद तराळ यांनी दोन अर्ज भरले होते. यापैकी एक अर्ज राष्ट्रवादी पक्षाकडून होता. त्यात एबी फार्म नसल्याने तोही बाद ठरविण्यात आला. वंचितचे उमेदवार नितीन कांडेलकर यांनादेखील दोन अर्ज दाखल केले होते. यात ए बी फार्म नसल्याने एक अर्ज अवैध ठरविण्यात आला.