सोशल मीडिया डाऊनलोडिंग सुरळीत; फेसबुकने व्यक्त केली दिलगिरी

0

नवी दिल्ली: सोशल मीडियात संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून आज व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुककडे पहिले जाते. मात्र काल बुधवारी (3 जुलै) व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरात डाऊन झाले होते. तब्बल 9 तासांनंतर सोशल मीडिया पूर्ववत झाले आहे. सोशल मीडियाचे डाऊनलोड बंद झाल्याने युजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागला. याबाबत फेसबुकने आता युजर्सची माफी मागितली आहे. युजर्सना त्रास झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.

बुधवारी जगभरात कोट्यवधी लोकांना फोटो पाठवण्यासह डाऊनलोडसुद्धा करता येत नसल्याचा अनुभव आला. अनेकांनी ट्विटर तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवर यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. ‘व्यवसाय, नोकरी आणि इतर क्षेत्रातील लोकांना फोटो, व्हिडीओ, फाईल्स पाठवताना आमच्या प्लॅटफॉर्मवर अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्यानंतर आता ही समस्या सोडवण्यात आली आहे. युजर्सना यामुळे जो त्रास सहन करावा लागला त्यासाठी आम्ही माफी मागतो.’ अशा शब्दांत फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली आहे.