सत्तेत सहभागी होण्यासाठी काहींनी पक्षांतर केले, लोकांना हे पटले नाही ; शरद पवार

0

बारामती: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. याबात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आमच्या डोक्यावरील जबाबदारीचे ओझे वाढले असून, भविष्यात तिची पूर्तता करणे कर्तव्य आहे आणि आम्ही ते अखंडपणाने करू,अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच सत्तेत सहभागी होण्यासाठी काहींनी पक्षांतर केले. मात्र, लोकांना हे पटले नाही. त्यांनी आमच्या बाजूने कौल दिला, असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी ठरलेल्या फॉर्म्युल्याची अंमलबाजवणी झाली पाहिजे. याचा अर्थ ५०-५० टक्के किंवा त्यांचे जे काही ठरले असेल ते. मागच्या वेळी शिवसेनेच्या चार-दोन गोष्टी राहून गेल्या. मात्र, या वेळी ते काही सहन करतील, असे असे दिसत नाही. त्यामुळे स्वत:चा आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल,असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीत कोणती लढाईच नाही, असे तिचे स्वरूप करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. लोकांनाही ही एकतर्फीच निवडणूक असे वाटले. मात्र, निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाला प्रभावी भूमिका मांडता आली नाही, तर लोकांना दोष देता येणार नाही. ती आमची कमतरता आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी यंदा आव्हान आहे, हे लक्षात आल्याने मी त्या पद्धतीने सामोरा गेलो. राज्यातील तरुणाईने मला प्रचंड प्रतिसाद दिला, याचा प्रचंड आनंद आहे.