जळगावला ‘एसटी’ महामंडळात महाभ्रष्टाचार?

0

जळगाव विभागात कर्मचारी भरती, बदली, अपिल (सुनावणी) प्रकरणांमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार

खा. अरविंद सावंत यांचे पत्र; चौकशी अहवालाची प्रतीक्षा

जळगाव – एसटी महामंडळाच्या जळगाव विभागात कर्मचारी भरती, बदली आणि अपिल (सुनावणी) प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणांत कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याची गंभीर तक्रार असून, या प्रकरणी गठित चौकशी पथकाच्या अहवालाची प्रतीक्षा कर्मचार्‍यांना आहे.

शिवसेनेचे उपनेते खासदार अरविंद सावंत यांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेत एसटीच्या जळगाव विभागातील अवैध कारभाराची चौकशी होण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांना (एमडी) पत्र पाठविले आहे. जळगाव विभागातील कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत ऑक्टोबर 2018 मध्ये एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीतील गांभीर्य लक्षात घेता व्यवस्थापकीय संचालकांनी पुढील चौकशीसाठी मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी, नाशिक यांना सूचित केले होते. या अधिकार्‍याच्या पथकाने डिसेंबर 2018 व फेब्रुवारी 2019 मध्ये जळगावला भेट देऊन तक्रारदाराचे म्हणणे नोंदवून घेतले. तसेच 120 कर्मचार्‍यांचे रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे. त्यावर चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे. तक्रारदाराने आपल्याकडील पुराव्यांची प्रत चौकशीकामी आलेल्या अधिकार्‍यांना सुपूर्द केल्याचे कळते.

120 अपिलांच्या सुनावणीवर प्रश्‍न
महाराष्ट्रात एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच 120 अपिले एकत्रित निकाली काढण्यात आली आहेत. त्यावर तक्रारदाराने संशय व्यक्त केला आहे. यामुळे या प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का? गंभीर स्वरुपाचे आरोप असलेले कर्मचारी, कायमची वेतनवाढ रोखलेले कर्मचारी यांच्याबाबतीत ‘बड्या’ अधिकार्‍यांनी सहेतूक ‘सॉफ्ट कॉर्नर’ ठेवला का? आदी प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे चौकशी अहवालातच मिळू शकणार आहेत

बडे मासे शोधण्याचे आव्हान
कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारीत दोन कर्मचार्‍यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. चौकशी अहवालात यावर शिक्कामोर्तब झाल्यास भ्रष्टाचाराच्या नाल्यातील बडे मासे शोधण्याचे आव्हान चौकशी पथकासमोर असेल. भ्रष्टाचाराची साखळी जळगाव ते मुंबई नाही ना? अशीही शंका कर्मचार्‍यांमधून घेतली जात आहे.

कर्मचार्‍यांचे मूळ गाव, नियुक्तीबाबतही चौकशीची मागणी
जळगाव विभागात जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या कर्मचार्‍यांच्या नियुक्ती आदेशांबाबतही चौकशी करावी, असा सूर उमटत आहे. गेल्या काही दिवसात ही प्रक्रिया झाली आहे. या कर्मचार्‍यांचे मूळ गाव, त्यांना सुरुवातीला आणि नंतर देण्यात आलेली नियुक्तीपत्रे याची सखोल छाननी व्हायला पाहिजे, असा सूर कर्मचार्‍यांमध्ये आहे.