राष्ट्रपती राजवट म्हणजे घोडेबाजाराला सुरुवात: शिवसेना

0

मुंबई: राज्यात कुठलाही पक्ष बहुमत सिद्ध करू न शकल्याने काल केंद्राने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. राष्ट्रपतीच्या सही नंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यावर शिवसेनेने टीका केली असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्याचा निषेध करत राष्ट्रपती राजवटीची शिफारस म्हणजे महाराष्ट्रात घोडेबाजाराला सुरुवात झाली नसली तरी त्या दिशेने पडलेले ते पाऊल असल्याचे म्हटले आहे.

सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधल आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दात शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर टीकेचे प्रहार केले आहेत. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपती राजवटीचे खापर शिवसेनेवर फोडले असले, तरी देखील राष्ट्रपती राजवटीला भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ठरल्याप्रमाणे भाजप आपल्या शब्दाला जागला असता तर परिस्थिती इतक्या थराला गेली नसती. शिवसेनेला जे ठरले आहे ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकड्यांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा असल्याची टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षासोबतचे कटू अनुभव आम्ही गेली अनेक वर्षे घेत असल्याचे सांगत २४ तारखेपासून सत्तास्थापनेची संधी असतानाही भाजपाने हालचाली केल्या नाहीत. भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही त्याला १५ दिवस सहज मिळाले आणि शिवेसनेला मात्र धड २४ तासही मिळाले नाहीत हे कसले कायदे? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.