जळगाव भाजपामध्ये फूट

0

आ. सुरेश भोळेंविरोधात शिजली शेवभाजी पार्टी

भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांची हजेरी, ‘तात्या’, ‘दादा’, ‘डॉक्टर’ यांचाही समावेश

जळगाव – जळगाव शहर मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात पक्षातील नाराजांचा एक गट सक्रीय झाला असून, रविवारी ममुराबाद रस्त्यावरील एका शेतात झालेल्या शेवभाजी पार्टीत ‘भोळे हटाव, भाजपा बचाओ’चा नारा घुमला, अशी माहिती एका निष्ठावंताने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

जळगाव भाजपामधील गटबाजी लपून राहिलेली नाही. विधानसभा, महापालिका निवडणुकीत प्रत्येक वेळी निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची भावना काही कार्यकर्त्यांमध्ये आहे. ‘आम्ही देखील आमच्या चपला पक्षासाठी झिजवल्या आहेत पण आम्हाला संधी का मिळत नाही?’ असा सूर नाराज कार्यकर्त्यांमध्ये असतो.पक्षाच्या जळगाव महानगर कार्यक्षेत्रात आ. भोळे यांची कार्यशैली अनेकांना रूचत नसल्याचे म्हटले जाते. महापालिका निवडणुकीत आ. भोळे यांच्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, तसेच तिकीट मिळालेले काही कार्यकर्ते कसे पडतील? यासाठी आ. भोळे यांनी आपली शक्ती खर्च घातली, असाही आरोप त्यांच्यावर केला जातो.

रविवारी, सायंकाळी ममुराबाद रस्त्यावरील भाजपाच्या एका कार्यकर्त्याच्या शेतात जळगाव शहरातील जुन्या कार्यकर्त्यांची शेवभाजी पार्टी झाली. 200 ते 250 जण याप्रसंगी उपस्थित होते. ‘तात्या’, ‘दादा’, ‘डॉक्टर’ यांचाही यात समावेश होता. त्यांच्या चर्चेत आ. भोळे व सरकारच्या कार्यशैलीविषयी तीव्र नाराजीचा सूर उमटला. तसेच ‘भोळे हटाव, भाजपा बचाओ’चा नारा घुमला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

खडके कुटुंबात उमेदवारी द्या
पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वामनदादा खडके किंवा त्यांचा मुलगा नगरसेवक सुनील खडके यांना विधानसभेची उमेदवारी पक्षाने द्यावी, अशी मागणी एका कार्यकर्त्याने शेवभाजी पार्टीत केली. खडके कुटुंबीय मुळचे जळगावचे आहे. लेवा पाटील समाजात त्यांचे प्रस्थ आहे. बाहेरून आलेल्यांपेक्षा स्थानिकांना संधी मिळायला हवी, असाही सूर या कार्यकर्त्याने व्यक्त केला.