खंडपीठाने ओढलेल्या ताशेर्‍यांविरोधात सुरेशदादा जैन सर्वोच्च न्यायालयात

0

जळगाव – वाघूर घोटाळाप्रकरणी दाखल गुन्ह्यात अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल देताना घरकुल घोटाळ्याचा उल्लेख करून संशयित सुरेशदादा जैन यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाचे ताशेरे ओढले. या विरोधात सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी कामकाज होवून सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅड. विजय भास्कर पाटील, शेख व महाराष्ट्र शासन यांना नोटीस काढली आहे.
वाघूर प्रकल्पासंदर्भात अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी तपास अयोग्य असल्याबाबत 3 मे रोजी याचिका (क्रमांक 603/2015) दाखल केली आहे. त्यावर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी . व्ही. नलावडे यांनी एसआयटी स्थापन करुन पुन्हा तपास करण्याचे निकालात म्हटले आहे. वाघूर घोटाळ्याशी घरकुलचा कुठलाही संबंध नसतानाही न्यायमूर्ती नलावडे यांनी घरकुल घोटाळ्याचा उल्लेख करुन सुरेशदादा जैन यांच्यावर ताशेरे ओढले होते. घरकुल घोटाळाप्रकरणी खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असतानाही वाघूरच्या याचिकेवर घरकुलला अनुसरुन ताशेरे ओढल्याचे सुरेशदादा जैन यांचे वकील अ‍ॅड. जितेंद्र निळे यांच्या निदर्शनास आले होते. त्या आधारे सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी कामकाज होवून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने याचिका दाखल करुन घेऊन विजय भास्कर पाटील, शेख व महाराष्ट्र शासन आदींना नोटिसा काढल्या आहेत, अशी माहिती अ‍ॅड. जितेंद्र निळे यांनी जनशक्तीशी बोलताना दिली.