नम्र फायनान्सच्या व्यवस्थापकानेच कट रचून 12 लाखांची रोकड लांबविली

0

बोदवड शहरातील गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून छडा ः सहा जण ताब्यात ः चोरीच्या रक्कमेतून चोरट्यांची मौजमजा

जळगाव: बोदवड शहरात जामठी रोडवरील नम्र फायनान्स् लिमिटेडमध्ये 12 लाख 8 हजार 252 रुपयांच्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. नम्र फायनान्सचा व्यवस्थापक व गुन्ह्यातील फिर्यादीनेच फिल्ड ऑफिसरच्या मदतीने कट रचून ही घरफोडी घडवून आणल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी बोदवड शहरातील भिलवाडा भागातील पाच जण व फिल्ड ऑफिसर अशा सहा जणांना ताब्यात घेतले आहे. चोरीच्या रकमेतून चोरट्यांनी घेतलेली नवीन दुचाकी, तीन मोबाईल तसेच 70 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.

कर्मचारी झोपलेला असताना लांबविली रोकड

बोदवड शहरात जामठी रोडवर भाड्याच्या फ्लॅटमध्ये न्रम फायनान्स लिमिटेड आहे. 13 रात्री कार्यालयात अमोल मोरे हा कर्मचारी होता. हेडफोनवर गाणे एैकत असल्याने त्याच्या कानात हेडफोन होते. मोबाईल स्विच ऑफ झाल्याने त्याने चॉर्जिंगला लावून तो झोपून गेला. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ठरल्याप्रमाणे फायनान्समधून 12 लाख 8 हजार 252 रुपये लांबविले होते. सकाळी कर्मचारी आल्यावर प्रकार उघड झाला होता. याठिकाणी 14 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी आल्यानंतर फायनान्सच्या कपाटातील 12 लाख 8 हजार 252 रुपयांची रोकड लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी बोदवड शहर पोलीस ठाण्यात फायनान्सचे व्यवस्थापक मनोज धर्मराज माळी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाकडून छडा

पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके यांनी घटनेची गंभीर दखल घेवून गुन्हा उघडकीस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. बापू रोहोम यांनी पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अशोक महाजन, रविंद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, दीपक पाटील, दादाभाऊ पाटील, रणजित जाधव, इंद्रीस पठाण , अशोक पाटील , मुरलीधर बारी, शरद भालेराव, गफुर तडवी, संदीप सावळे, वहीदा तडवी, वैशाली महाजन अशांचे पथक तयार करुन मुक्ताईनगर, बोदवड , बुलढाणा, मलकापुर भागात रवाना केले होते. तसेच तांत्रिक माहिती तपासणे कामी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांनी सहकार्य केले.

विमा नाकारल्याने व्यवस्थापकाचा होता रोष

नम्र फायनान्सचे व्यवस्थापक मनोज माळी यांना स्वतःबाबत घडलेल्या अपघाताच्या घटनेत कंपनीने विमा तसेच विम्याचे पैसे नाकारले होते. तेव्हापासून माळी यांचा न्रम फायनान्सवर रोष होता. या रोषातून व्यवस्थापक माळी याने फिल्ड ऑफिसर सुनील कडू इंगळे यांच्या मदतीने फायनान्समधून रोकड लांबविल्याचा कट रचला. इंगळे यांनी बोदवड शहरातील विकास मधुकर पवार याच्याशी संपर्क साधला. पैसे कधी जमा होता, कुठे असतात, याबाबतची माहिती इंगळे यानेच संशयितांना पुरविली. त्यानुसार पवार याने त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने घटनेला अंजाम दिला.

संशयितांपैकी तीन जण रेकार्डवरील गुन्हेगार

या गुन्ह्यात किसन उर्फ शेंडया कैलास सोनवणे वय – 22 , विलास मधुकर पवार वय-24, प्रविण सुखा धुलकर उर्फ लहाण्या रा.भिलवाडा, बोदवड , गणेश सोपान पवार वय -25 ,रा.भिलवाडा, बोदवड, प्रदीप किशोर सोनवणे वय – 20, सर्व रा.भिलवाडा, बोदवड व फिल्ड ऑफिसर सुनिल कडु इंगळे वय – 30, रा.निमखेडी बु. ता.मुक्ताईनगर ह.मु.शारदा कॉलनी, बोदवड या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दुचाकी, तीन मोबाईल व 70 हजाराची रोकड असा एैवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. यात किसन सोनवणे, विलास पवार व प्रविण धुलकर हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे.

चोरट्यांनी मौजमजा, अन् गुन्ह्याचा धागा सापडला

चोरीनंतर प्रत्येकी दीड लाख रुपये पाचही जणांनी वाटून घेतले व इतर रक्कम व्यवस्थापक तसेच फिल्ड ऑफिसरने घेतली. या रकमेतून संशयित किसनने नवीन महागडी दुचाकी तर प्रविणने स्वतःसाठी दोन मोबाईल व मित्राला एक नवीन मोबाईल घेतला. यासह संशयितांनी त्यांच्या मित्रांना दारुच्या पार्ट्या तसेच काही पैसे उधारी देत मौजमजा केली. याबाबतची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक पाटील, रविंद्र पाटील यांन ा मिळाली. व गुन्ह्याचा धागा गवसला. व गुन्हा उघड झाला.