पंतप्रधानांना ‘वर्क’ मोडचा पडला विसर

0

बंगळुरू – विधानसभा निवडणुकीच्या रंगतदार प्रचाराने कर्नाटक ढवळून निघाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. राजधानी बंगळुरूच्या ग्रामीण भागात प्रचारदौरा करणाऱ्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर मार्मिक टीका केली. मोबाईल फोनमध्ये स्पीकर मोड, एअरप्लेन मोड आणि वर्क मोड असे तीन प्रकारचे मोड असतात. पंतप्रधान मोदी यातील केवळ स्पीकर आणि एअरप्लेन मोडचा वापर करतात. वर्क मोडचा वापर कधीच करत नाहीत, अशा उपरोधिक शब्दांत राहुल यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

राहुल गांधी यांचा कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा नववा आणि अखेरचा टप्पा सुरू आहे. बंगळुरूच्या ग्रामीण भागात राहुल गांधी यांनी रोड शो केला. केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीला विरोध करण्यासाठी त्यांनी सायकल रॅली काढली. राहुल स्वत: सायकल चालवत रॅलीत सहभागी झाले आणि सरकारी धोरणांचा निषेध केला.