आयात झालेल्या नेत्यांची परिस्थिती ‘ना घर का, ना घाटका’

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती लागला असून, सेना, भाजप मध्ये आपले बस्तान बसवण्यासाठी आलेले बंडखोर नेत्यांची परिस्थिती ना घर का, ना घाट का अशि परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना आणि भाजपामध्ये अनेक नेत्यांची मेगा भरती सुरू होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आणि उमेदवार सेना-भाजपानं फोडून स्वतःच्या पक्षात घेतले होते. त्यानंतर त्यांना उमेदवारीही देण्यात आली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सेना-भाजपानं आयात केलेल्या एकूण 35 आयारामांपैकी 19 जणांचा पराभव झालेला आहे. त्यातील शिवसेनेचे 11 आणि भाजपाच्या 8 आयाराम उमेदवारांचा समावेश आहे.

निकालानंतर शरद पवारांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाची अब की बार 220 पार ही घोषणा जनतेला पटली नाही. सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. पक्षांतराला जनतेनं पाठिंबा दिलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांना जनतेनं पराभूत केले. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. श्रीनिवास पाटील जनतेचं प्रश्न सोडवतील, असा विश्वास आहे. निवडणुकीच्या निमित्तानं मोदी-शहांनी महाराष्ट्र दर्शन केले. मोदी शहांच्या दौऱ्याचा राज्याच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही. नव्या समीकरणाबद्दल सर्व मित्रपक्षांशी चर्चा करूनच ठरवणार आहे, असं पवार म्हणाले आहेत.

तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आधीच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा-विदर्भातील अनेक नेत्यांनी सेना-भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक आमदारांनी सेना-भाजपात प्रवेश केल्यानं आघाडी काहीशी खिळखिळी झाली होती. त्यात मधुकर पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर, दिलीप सोपल, सचिन अहिर यांच्यासह अनेक नेत्यांनी युतीतल्या शिवसेना-भाजपा पक्षात प्रवेश केला होता. पक्षांतर केलेल्या नेत्यांमुळे काँग्रेस-आघाडीचा निवडणुकीत एवढा प्रभाव राहणार नाही, अशी चर्चा होती. पण त्यातच यातील काही आयात उमेदवारांना सेना-भाजपानं उमेदवारी दिली असून, ‘त्या’ आयारामांना जनतेनंच चांगला धडा शिकवला आहे.