उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर रहावे; कॉंग्रेस, राष्ट्रवादीची मागणी

0

मुंबई: सेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष एकत्र येत महाआघाडी स्थापन केली आहे. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे जाणार हे निश्चित झाल्यावर मुख्यमंत्री पदावर कुणाला बसवावे यावर चर्चा सुरु झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचे सुभाष देसाई व विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. नव्या सरकारचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच भूषवावे, अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची आग्रही मागणी असल्याचे वृत्त खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे.

सत्तास्थापनेच्या दृष्टीनं काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये उद्धव यांच्याच नावाला पसंती देण्यात आली. स्थिर सरकार द्यायचं झाल्यास उद्धव यांनीच मुख्यमंत्री व्हावं, असं आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेला कळविलं असल्याचं एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री द्यायचं की पाच वर्षे हे आघाडीच्या दृष्टीनं फारसं महत्त्वाचं नाही. उद्धव यांनी सरकारचे नेतृत्व करावं, यावर आघाडीचा अधिक भर राहणार असल्याचं कळतं.

शिवसेनेच्या महिला नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही तीच भावना व्यक्त केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी गेली २० वर्षे अनेक आव्हानांना तोंड देऊन पक्षाचं समर्थपणे नेतृत्व केलं आहे. त्यामुळं आता राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी उचलावी. तमाम शिवसैनिक व आमदारांचंही तेच मत आहे,’ असं गोऱ्हे म्हणाल्या.