कुलभूषण जाधवला वागणूक देतांना पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन

0

नवी दिल्ली: कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला पुन्हा एकदा सुनावले आहे. कुलभूषण जाधव यांना देण्यात आलेल्या वागणुकीवरून पाकिस्ताने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठेवला आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत हे सांगितले आहे. कुलभूषण प्रकरणात 17 जुलैला जारी करण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती अब्दुलकावी वुसुफ यांनी पाकिस्तान कुलभूषण प्रकरणात व्हिएन्ना करारांतर्गत येणाऱ्या कलम 36चे उल्लंघन केले आहे. या प्रकरणात त्यांनी योग्य पावले उचलली नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. परंतु आंतरराष्ट्रीय न्यायालयाने झटका दिल्यानंतर पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना पहिल्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस दिला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी भारताच्या उप उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी कुलभूषण जाधव यांची भेट घेतली होती. दोघांत जवळपास दोन तास चर्चा झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव चर्चेचे ठिकाण जाहीर केलेले नाही. ही भेट इस्लामाबादमधील एका अज्ञात ठिकाणी झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.

कुलभूषण यांना 2016 साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कुलभूषण यांनी कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस मिळाला होता. भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणल्यामुळे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र यावेळी पाकिस्ताननं जाधव यांच्या आई आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली होती. कुलभूषण जाधव यांना भेटण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र काढायला सांगितलं होतं. यानंतर काही दिवसांनी पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये कुलभूषण स्वत:ला हेर म्हणत होते. मात्र, हा व्हिडीओ पाकिस्ताननं दबावाखाली तयार केल्याचा आरोप झाला होता.