यशासाठी आघाडी, युतीचा बूथ रचनेवर भर
जळगाव – 17 व्या लोकसभेतील विजयासाठी आघाडी आणि युतीने कंबर कसली असून, मतदारांशी थेट संपर्कासाठी ‘बूथ रचना’ बळकट करण्यात आली आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकीनंतर बूथ रचनेचा सर्वाधिक बोलबाला झाला होता. लोकसभेत बहुमतासाठी महाराष्ट्रातील एक-एक जागा जिंकणे आघाडी व युतीसाठी आवश्यक झाले आहे. त्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून मायक्रो प्लानिंग सुरू होते. जाहीर प्रचार व सभांचे नियोजन हे घटक असतातच पण त्याच बरोबरीने बूथ रचना अधिक बळकट करण्याचेही काम पक्षांनी केले आहे. दरम्यान, जळगाव व रावेर मतदारसंघात कोणत्या पक्षाची किती तयारी झाली आहे हे 23 मे रोजी लागणार्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे.
‘शत-प्रतिशत भाजपा’मधून महाराष्ट्रात विस्तारली बूथरचना; पन्ना प्रमुखांचा राहणार महत्त्वाचा वाटा
महाराष्ट्रात 2003 मध्ये भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब फुंडकर यांनी ‘शत-प्रतिशत भाजपा’, असे सांगितले होते. पक्षाचे हे स्वप्न साकार करण्यासाठी काय-काय करायचे? यातूनच शक्ती केंद्र प्रमुख यासह इतरही अभिनव संकल्पना पुढे आल्या. 2005 ते 2007 पर्यंत नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात मतदार संपर्कासाठी ‘1 बूथ-10 युथ’ रचना लावली गेली. नंतर पुढे प्रत्येक प्रदेशाध्यक्षाच्या कार्यकाळात यात नवनवीन संकल्पनांची भर पडत गेली. आज बूथ रचनेचा पन्ना प्रमुखांपर्यंत कार्यविस्तार झाला आहे. मतदार आणि सरकार यांच्यातील संपर्क आणि संवादाचे माध्यम म्हणूनही बूथ रचनेकडे पाहिले जाते. ‘बूथ जितो, देश जितो’, असा विचारच गेल्या वेळी पक्षाच्या नेतृत्त्वाने मांडला होता. – सुनील बढे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजपा
काँग्रेसकडून शास्त्रशुध्द रचना, दक्षिणेतील तज्ज्ञांची घेतली मदत
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसने जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोनही मतदारसंघात बूथरचना बळकट करण्यासाठी या विषयातील तज्ज्ञ आणि तेलंगणातील पक्षाचे आमदार वामशी रेड्डी यांची मदत घेतली आहे. गेल्या एक वर्षांपासून यावर काम सुरू होते. प्रत्येक बूथमध्ये एक केंद्रप्रमुख नियुक्त आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 318 ते 340 बूथ आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्येदेखील (2014) ही रचना होती पण यावेळी ती अधिक व्यावसायिक (प्रोफेशनल) पध्दतीने तयार करण्यात आली आहे. – संदीपभैय्या पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
काँग्रेसच्या स्थापनेपासून बूथ रचना; आता तंत्रज्ञानाची जोड, अॅपही विकसित
काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात बूथ रचना आहे. त्यामुळे ही संकल्पना मूळ काँग्रेसची असल्याचे म्हणणे चुकीचे ठरत नाही. पक्षाने नुकतेच ‘शक्ती अॅप’ विकसित केले असून, या माध्यमातून दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना थेट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे अधिक सोयीचे झाले आहे. निडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने बूथरचना अधिक बळकट करण्यात आली आहे. – विनायकराव देशमुख, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती
शिवसेनेचा 1 बूथ 10 युथवर भर, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न
शिवसेनेने संपूर्ण महाराष्ट्रात 1 बूथ 10 युथवर भर दिला आहे. यामुळे लहान-मोठ्या गावांपर्यंत पोहोचणे पक्षाला शक्य झाले आहे. याचा लाभ पक्षाला मतदानाची टक्केवारी वाढण्यात होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 300 बूथ आहेत. याशिवाय जि. प. सर्कलसाठी प्रमुखही नेमण्यात आला आहे. – गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख शिवसेना
राष्ट्रवादीने बूथ रचनेत नेते-कार्यकर्त्यांना जोडले मतदारांशी
बूथ रचना प्रत्येक राजकीय पक्षाचा आत्मा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नेते व कार्यकर्त्यांना या माध्यमातून एकमेकांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. यामुळे मतदारांशीही संपर्क साधता येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तेथील मतदारसंख्येनुसार बूथची संख्या आहे. – रवींद्रभैय्या पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस