दिव्यांगांच्या मतदार जनजागृती रॅलीने शहरवासियांचे वेधले लक्ष

0

निवडणुकीच्या राष्ट्रीय उत्सवात सर्वांनी सहभागी व्हा : निवडणूक निरिक्षक पार्थसारथी मिश्रा

जळगाव :आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने निवडणुकीचा हक्क बजावला पाहिजे. निवडणुकीच्या या राष्ट्रीय उत्सवात सर्वांनी उत्सफुर्तपणे सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन दिव्यांगांनी मतदार जनजागृती रॅलीव्दारे केले. शहरात काढण्यात आलेल्या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते. या रॅलीत उत्कर्ष मतिमंद विद्यालय, अंध औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दीपस्तंभ व मनोबल संस्था तसेच मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

मतदानाची टक्केवारी वाढीबरोबर मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत बुधवारी शहरात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला निवडणूक निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी उपजिल्हा निवडणुक अधिकारी श्री. तुकाराम हुलवळे, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त् श्री. अरविंद मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एच. चव्हाण, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी श्री. बी. जे. पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, दीपस्तंभ चे संचालक यर्जेुवेद महाजन, जिल्हा आयकॉन तथा मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

स्वतः मतदान करा, इतरांनांही प्रोत्साहित करा..

यावेळी बोलतांना पार्थ सारथी मिश्रा म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपण एकट्याने मतदान नाही केले तर काय फरक पडणार हा विचार न करता, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी मतदान केंद्रांवर रॅम्प तयार केले आहे, व्हीलचेअर उपलब्ध करणे, मतदान केंद्रावर जाण्यासाठी मागणीनुसार वाहन व्यवस्था, मतदान करण्यासाठी मदतनीसची उपलब्धता, दिव्यांगाचा आत्मविश्वास वाढविणेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रत्येकाने स्वत: मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

जनजागृतीपर संदेशाचे विविध फलक

लोकतंत्र का भाग्य विधाता, होता जागरुक मतदाता, चला दिव्यांगांनो मतदार करुया, स्वतःसह देशाची प्रगती घडवूया, नवे वारे नवी दिशा, मतदानाच आहे उद्याची आशा, छोडकर सारे काम, चलो करे मतदान, असे संदेश असलेल्या फलक घेवून दिव्याग घोषणा देत होते, या घोषणांनी परिसर दणाणला होता.