जळगाव जिल्ह्यात 80 ते 100 बिबट्यांचा वावर

0

जंगलात तयार करण्यात आले आहेत पाणवठे; वनविभागाच्या अधिकार्‍यांचा दावा

जळगाव – सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याची तहान भागविण्यासाठी जंगलातील बिबटे हे नागरी वस्तीकडे धाव घेत आहे. जंगलातील प्राण्यांना जंगलातच पाणवठ्याची व्यवस्था वनविभागाने केली असून, जिल्ह्यात 80 ते 100 बिबटे असल्याचा दावा वनविभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. या प्राण्यांचे निश्‍चितीकरण करण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले असल्याची माहिती जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक डिगंबर पगार यांनी दिली.

उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ बिबटे शहरी भागाकडे धाव घेतात. जंगली प्राणी जंगलातच राहावेत यासाठी वनविभागाच्या हद्दीत ठिकठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. त्यात दररोज पाणी टाकण्याची सूचना कर्मचार्‍यांना केली आहे, अशी माहिती डिगंबर पगार यांनी दिली. जंगलात उन्हाळ्यात पाणी नसते. यामुळे जंगली प्राणी पाण्यासाठी शहरांकडे धाव घेतात. शहराकडे आल्यानंतर त्यांना पाणी मिळेतच सोबतच खाद्यही मिळते. यामुळे बिबट्यांचा वावर शहरी भागात गेल्या काही वर्षात अधिक वाढला आहे.

बिबट्याने लपण्याची जागा बदलली
जळगाव तालुक्यातील देऊळवाडी येथे बिबट्याने एकावर हल्ला केल्याची घटना घडली होती. बिबट्या सहसा माणसांवर हल्ला करीत नाही मात्र, देऊळवाडी येथे शेतात पाणी देणार्‍यांवर बिबट्याने हल्ला केला. या शेतात रानडुकरे येत होती. रानडुकरे खाण्यासाठी बिबट्या तेथे आला होता. या परिसरात दोन पिंजरे ठेवून त्यात खाद्य म्हणून बकरीही ठेवण्यात आली आहे. बिबट्या पिंजर्‍याजवळ आला मात्र पिंजर्‍यातील बकरीजवळ गेला नाही. नागरिकांची गर्दी असल्याने त्याने लपण्याची जागा बदलविली असावी, असा दावा वनविभागातर्फे करण्यात आला आहे.