भुसावळात व्हॅनच्या धडकेत तरुण ठार

0

शहरतील खडका चौफुलीजवळील घटना; अपघात प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भुसावळ : भरधाव टाटा पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास खडका चौफुलीजवळ घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने धडक देणार्‍या पीकअप वाहनासह एका टाटा मोबाईल वाहनाचीही जाळपोळ केली. एक ते दिड तास होवूनही पालिकेचा अग्निशमन बंब न पोहोचल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघात प्रकरणी बाजारपेठ पोलिसात टाटा पीकअप वाहनाच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या वाहनाचा चालक मात्र पसार झाला आहे.

भरधाव पीकअपने दुचाकीला उडवले

सूत्रांच्या माहितीनुसार, हर्षल गणेश कोळी (20, कोळीवाडा, भुसावळ) व शुभम लोहार हे दोन्ही मित्र वरणगावकडून साकेगावकडे दुचाकी (एम.एच.19 डीजे 7243) वरून जात असताना भरधाव टाटा पिकअप (एम.एच.19 सीवाय.3966) ने जोरदार धडक दिल्याने हर्षल कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर शुभम हा जखमी झाला. राष्ट्रीय महामार्गावरील खडका चौफुलीजवळील बालाजी तोलकाट्याजवळ हा अपघात झाला तर अपघातानंतर पीकअप चालक पसार झाला तर अपघाताची माहिती कळताच कोळीवाड्यातील आप्तेष्टांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातप्रकरणी प्रवीण प्रभाकर सोनवणे (48, कोळीवाडा, जुना सातारा, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून टाटा पीकअप वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जयेंद्र पगारे करीत आहेत.

संतप्त जमावाने दोन वाहने जाळली

अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने सुरुवातीला भरधाव टाटा झेनॉन पिकअप (एम.एच.19 सीवाय.3966) वाहन पेटवले तर काही वेळाने वरणगावकडून येणारे टाटा मोबाईल वाहन (एम.एच.19 बी.एम.4533) ला पेटवून दिल्याने महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. बाजारपेठ पोलिसांना याची माहिती मिळताच एएसआय अडकमोल, यासीन पिंजारी, प्रशांत परदेशी, चालक बंटी कापडणे आदींनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला. यावेळी अत्यवस्थ अवस्थेतील हर्षल कोळीला पोलिस वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुक्रवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, दिड ते तास झाल्यानंतरही अग्निशमन दलाचे वाहन न आल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर मध्यरात्री अग्निशमन दलाने वाहनांना लागलेली आग विझवली. या घटनेत जखमी झालेला शुभम बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्याच्या जवाबानंतरही अपघाताचे नेमके कारण कळणार आहे.