जि.प. जलव्यवस्थापनच्या सभेत खडाजंगी

0

जिल्ह्यात अतिपाऊस मात्र जलसाठ्याची अधिकार्यांकडे आकडेवारीच नाही

जळगाव: यावर्षी जिल्ह्यात अतिपाऊस झाला आहे. दिवाळी संपली तरी देखील पाऊस थांबण्याचे चिन्ह नाही. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वच पाझर तलाव, धरणे भरलेली आहेत. मात्र यात किती जलसाठा आहे, यासह किती सिंचन झाले याविषयी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाला कोणतीही माहिती देता आली नसल्याने सदस्यांनी बुधवारी 30 रोजी झालेल्या जलव्यवस्थापन समिती सभेत नाराजी व्यक्त करत अधिकार्‍यांवर ताशेरे ओढले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. यावेळी शिक्षण सभापती पोपट भोळे, सदस्य प्रभाकर सोनवणे, मीनाताई पाटील, पवन सोनवणे आदी
उपस्थित होते.

कनिष्ठ अभियंत्यावर कारवाईची मागणी

जलव्यवस्थापनच्या सभेला अनुपस्थित राहत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यावर कारवाईचा ठरावही करण्यात आला आहे. लघुसिंचन विभागाअंतर्गत अनेक ठिकाणी पाझरतलाव बांधण्यात आले. यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाला असताना या तलावातील पाणीसाठा मोजण्यात आलेले नाही. चाळीसगाव तालुक्यातील उपअभियंत्यांनी याचे अंदाजपत्रकही सादर करीत नाहीत. याविषयी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍या कनिष्ठ अभियंत्यांचे वेतन थांबविण्यात यावे. यासह अभियंते बैठकींना उपस्थित राहत नसल्याने पुरेशी माहिती व वस्तूस्थिती समजत नाही. यामुळे बैठकींना अनुपस्थित अभियंत्यांवर कारवाईचेही मागणी सदस्यांनी केली.

ठेकेदारांविषयी नाराजी

जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेचे लावण्यात आलेले संदेश फलक हे ठेकेदाराने चुकीच्या ठिकाणी लावले आहेत. यामुळे मूळ उद्देश साध्य होत नसल्याने यामुळे ठेकेदारास समज देण्याची मागणीही करण्यात आली. न्हावी (ता.यावल) येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेतील जलकुंभाच्या दुरूस्तीसाठी 65 लाखाचा निधी मंजूर झाला. दुरुस्ती करूनही जलकुंभातील गाभार्‍यातील भाग जीर्ण झाल्याने बांधकाम टिकत नाही. यामुळे या कामास वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट देवुन पाहणी करावी, व नवीन जलकुंभाचा प्रस्ताव तयार करावा अशी मागणी प्रभाकर सोनवणे यांनी केली.

अध्यक्षांच्याच गावात पाणीटंचाई

जि.प. अध्यक्ष उज्जवला पाटील यांच्या कासोदा येथील गावात सामुहीक पाणी योजनेचे 50 लाखाचे वीजबील थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल दीड महिन्यापासून गावाला पाणीपुरवठा होत नाही. याबाबत जलव्यवस्थापनच्या सभेत तक्रार करण्यात आली. याविषयी सीईओंनी अभियंत्यांनी भेट देवुन पाहणी करण्याचे निर्देश दिले. दरम्यान सरपंचांनी याविषयी कोणतीही माहिती न दिल्याने यावर निर्णय घेता आला नसल्याचे अध्यक्ष उज्जवला पाटील यांनी सांगितले.